श्रीगोंदा, दि. २७ ऑगस्ट २०२५ :
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता महंमद महाराजांच्या पटांगणात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या मेळाव्याचे आयोजन तालुक्यातील नेते राजेंद्र नागवडे, राहुल जगताप, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नाहाटा, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार व भगवान पाचपुते यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. मेळाव्याच्या यशस्वी पार पडण्यासाठी गटानिहाय नियोजन करण्यात आले असून, तालुक्यातील सर्वच भागातून शेतकऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पत्रकार परिषदेत आयोजकांनी सांगितले की, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांवर अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. त्यामध्ये
- कर्जमाफी व वीजबिल माफी
- महंमद महाराज ट्रस्टशी संबंधित विषय
- माणिक डोह व डिंबे प्रकल्प
- सिस्पे व इतर पाणी प्रकल्प
- तालुक्यातील रस्ते व कारखान्यांचे प्रश्न
अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. या सर्व प्रश्नांवर तोडगा निघावा, उपाययोजना ठोस स्वरूपात व्हाव्यात आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या मागण्या थेट शासनापर्यंत पोहोचणार असल्यामुळे हा मेळावा ऐतिहासिक ठरणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, शेतकरी वर्ग हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांचे प्रश्न सुटले तरच खरी समृद्धी येईल.
शेतकऱ्यांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रश्न थेट मांडावेत व त्यांच्या समाधानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.