श्रीगोंदा, दि. ३० ऑगस्ट २०२५ :
इनामगाव-ढोकराई रस्ता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पूर्ण झालेला असून, त्याचे उद्घाटन औपचारिकरीत्या झाल्याबद्दल कुणाच्या पोटात दुखण्याचे काहीही कारण नाही, असे प्रतिपादन वांगदरी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय नागवडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
संजय नागवडे यांनी म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे २९ ऑगस्ट रोजी श्रीगोंद्यातील शेतकरी मेळाव्यासाठी आले असताना ढोकराई-इनामगाव रस्त्याचे औपचारिक उद्घाटन झाले. “तेथे ना सभा झाली, ना भाषण. चालता चालता फीत कापली एवढेच. त्यावरुन केली जाणारी टीका ही अतिशय हास्यास्पद आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी आठवण करून दिली की, या रस्त्याचे डांबरीकरण स्व. शिवाजीराव बापू नागवडे आमदार असताना २००३-०४ मध्ये झाले होते. त्यानंतर तब्बल १२-१५ वर्ष या रस्त्याची दुरावस्था सुरू होती, अपघात झाले, गाड्यांचे नुकसान झाले, प्रवाशांना त्रास झाला, मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधीने दखल घेतली नाही. “अजितदादा पवार यांनी गेल्या वर्षी वांगदरी येथे आल्यावर रस्त्याची दयनीय अवस्था पाहिली. त्यानंतर राजेंद्रदादा नागवडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे निधी मिळाला आणि आज हा रस्ता पूर्णत्वाला आला आहे,” असे त्यांनी सांगितले.
रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर त्याच्या उद्घाटनावरून राजकारण केले जात आहे, यावर नाराजी व्यक्त करताना संजय नागवडे म्हणाले की, “जेव्हा सी.आर.एफ. मधून इनामगाव-वांगदरी-ढोकराई मार्गे जाणारा ५४८ डी रस्ता दुसरीकडे वळविण्यात आला, तेव्हा कुणीच आक्षेप घेतला नाही. आज मात्र आमच्या प्रयत्नाने झालेल्या कामाच्या उद्घाटनावरून अनाठायी टीका केली जात आहे. टिकाकारांच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते.”
तसेच, वांगदरी येथील घरकुल योजनांचे अपूर्ण काम आठवण करून देत नागवडे यांनी विरोधकांना टोला लगावला. “गावच्या सरपंचांना वा ग्रामस्थांना कल्पना न देता, फक्त निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्र्यांकडून घाईघाईत झालेले घरकुल कामाचे उद्घाटन लोक विसरले नाहीत. त्यामुळे आता विकासकामांमध्ये राजकारण टाळून सर्वांनी सहकार्य करावे,” असे आवाहनही त्यांनी केले.