श्रीगोंदा,दि.११ सप्टेंबर २०२५ :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व संविधान साक्षरतेसाठी अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले रावसाहेब घोडके यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण भूमी सन्मान कार्यक्रम समिती, नवी दिल्लीच्या अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष इंद्रेश गजभिये यांच्या आदेशानुसार समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे यांनी घोडके यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले.
गेल्या अनेक वर्षांपासून रावसाहेब घोडके हे ग्रामीण व उपनगर भागात सायकल यात्रेद्वारे संविधानाचे महत्त्व, सामाजिक समता व आंबेडकरी विचारांचा प्रचार करत आहेत. कोणत्याही राजकीय वा आर्थिक पाठबळाशिवाय त्यांनी सतत कार्य सुरू ठेवले असून, “समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत संविधानाचा खरा अर्थ पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे”, असे ते सांगतात.
या नियुक्तीबद्दल देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. केंद्रीय मंत्री सत्यनारायण जाटिया, चरणसिंग अग्रवाल, माजी लोकसभा उपाध्यक्ष अर्जुन मेघवाल, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी मंत्री बबनराव घोलप, तसेच पत्रकार संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुदाम कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
समितीमार्फत संविधान साक्षरता मोहीम, महापुरुषांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या कार्यशाळा, तसेच समाजातील एकात्मता व बंधुभाव वृद्धिंगत करणारे उपक्रम राबवले जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
रावसाहेब घोडके यांची ही नियुक्ती म्हणजे संविधान प्रचारासाठी संघर्षशील कार्यकर्त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याचा सन्मान असल्याचे मानले जात आहे.