टीम लोकक्रांती : कर्जत प्रतिनिधी दि.८ ऑक्टोबर २०२२ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता प्रयत्नशील राहिले पाहिजे. अडथळ्यांच्या व संघर्षाच्या वाटेवर जिद्द व चिकाटी बाळगली तर उद्योजकीय क्षेत्रात दैदिप्यमान यश खेचून आणता येते. असे विचार मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक मा.बापूसाहेब खराडे यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग व उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘उद्योजक आपल्या भेटीला’ या मुक्त संवाद कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. काळ स्पर्धेचा आहे परंतु या स्पर्धेच्या युगात विविध उद्योजकीय कौशल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांनी उद्योगधंद्याकडे पाऊल टाकले तर यशस्वी उद्योजक घडले जाऊ शकतात असे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत उद्योजकीय कौशल्यांचा उहापोह मा.बापूसाहेब खराडे यांनी केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते. तन, मन ,धन अर्पण करून स्वप्नांचा पाठलाग केला तर विद्यार्थी भविष्यातील यशस्वी उद्योजक म्हणून घडला जाऊ शकतो त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःचे ध्येय व पथ ठरवणे गरजेचे आहे. उद्योजक घडतात परंतु त्यामागे कष्ट, जिद्द,चिकाटी यांची त्रिसूत्री असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मा.बापूसाहेब खराडे यांच्यासारखी कष्ट, जिद्द,चिकाटी ठेवली तर नक्कीच यशाचा उद्योजकीय राजमार्ग तयार होईल, असे विचार मा प्राचार्य डॉ.संजय नगरकर यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य व प्रमुख प्रा.भागवत यादव यांनी दादा पाटील महाविद्यालय राबवत असलेल्या ‘उद्योजकता शॉर्ट टर्म कोर्स’ बाबत माहिती देऊन कार्यक्रमाची रूपरेषा व अतिथींचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्वप्नील म्हस्के यांनी केले तर आभार प्रा. शरद सूर्यवंशी यांनी मानले.
यावेळी प्रशांत शिंदे, वैष्णवी दवणे, शिवम देशमाने,सुमित मुळे आदि विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथींना प्रश्न विचारून उद्योजकीय संकल्पनांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त वनअधिकारी,अनिल तोरडमल, बाळासाहेब साळुंके, सुभाषचंद्र तनपुरे, तात्यासाहेब ढेरे, प्रा.प्रकाश धांडे, प्रा.संतोष क्षीरसागर, प्रा.अक्षय मंडलिक, प्रा.जयश्री खराडे, मुन्ना शेख, प्राध्यापक ,प्राध्यापिका शिक्षकेतर सेवक व वाणिज्य विभागातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)