टीम लोकक्रांती : मढेवडगाव प्रतिनिधी : दि.२० नोव्हेंबर २०२२ : दि.१८नोव्हेंबर रोजी देवदैठण येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत या विषयावर कृषिदुत प्रथमेश माने, साईनाथ मोरे, यश नलावडे, अभिषेक पचोरे, कृष्णा पालवे यांनी बोर्डो मिश्रण आणि त्याचे फायदे यावर मार्गदर्शन केले. कृषिदुत माहिती सांगत असताना म्हणाले, प्रा. पी.ए. मिलार्डेट यांनी १९८२ मध्ये प्रथम मोरचूद आणि चुना यांच्या मिश्रणाचा फ्रान्समध्ये द्राक्षांवरील केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी वापर केला. तेव्हापासून सर्वत्र अनेक पिकांवर विशेषतः भाजीपाला आणि फळबागांवर पडलेल्या बुरशीजन्य रोगांवर एक प्रभावी उपाय म्हणून बोर्डो मिश्रणाचा उपयोग केला जात आहे.
ही खबरदारी घ्या
बोर्डो मिश्रण तयार करताना कळीचा चुना दगडविरहित असावा, मिश्रण करताना धातूच्या भांड्याचा वापर करू नये, फवारणी होईपर्यंत प्लॅस्टिक ड्रममध्ये मिश्रण साठवावे, दोन अलग केलेली द्रावणे एकमेकांत मिसळताना थंड असावीत, फवारणीसाठी मिश्रण वस्त्रगाळ करून वापरावे, पावसाळ्यात मिश्रण वापरताना चिकट द्रव (स्टिकर) सोबत वापरावे, क्षारयुक्त पाणी वापरू नये, खराब चुना किंवा भुकटी वापरू नये, मिश्रण ढवळताना लाकडी किंवा प्लॅस्टिक काठीचाच वापर करावा, असे कृषिदुतांनी शेतकऱ्यांना सांगितले.
यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल गोंधळी, कार्यक्रम समन्वयक प्रा. सुप्रिया बंडगर व विशेषज्ञ प्रा. अश्विनी भोसले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : गोरख उंडे)